Ad will apear here
Next
‘दरवळ’


लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?

‘गदिमां’ची ही कविता आणि यासारख्या अनेक कवितांनी ज्या चाफ्याचा सुगंध अजरामर केला, तो चाफाच आजचा आपला या लेखाचा विषय आहे. चाफा असं नुसतं म्हटलं, तरी मन कसं ताजंतवानं होतं, त्याचे आकर्षक आकार, त्याची रंगसंगती आणि त्याचा मंद सुवास मनाला बेधुंद करतो... 

अशाच या सोनचाफ्याच्या कलमांचा स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करणाऱ्या, अस्सल कोकणच्या लाल मातीतल्या सुगंधवेड्या ‘उदय गोपीनाथ वेलणकर’ यांची ही यशोगाथा... 

आत्मनिर्भर, व्होकल फॉर लोकल या अलीकडच्या महिन्या-दोन महिन्यांत फेमस झालेल्या संज्ञा; पण सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातल्या वेताळ बांबर्डेसारख्या दुर्गम गावात राहणाऱ्या वेलणकर परिवाराने तीन दशकांपूर्वीपासूनच त्या आपल्याशा केलेल्या आहेत. ऐंशीच्या दशकात वडिलोपार्जित शेती बागायती सांभाळत गावोगावच्या बाजारात फुलझाडे आणि फळ झाडांची कलमे नेऊन विकणे ते आज वर्षाकाठी ‘वेलणकर चाफा’ या स्वतःच्या ब्रँडची दहा हजार कलमे घरबसल्या विकणे, हा त्यांचा प्रवास मोठ्या कष्टाचा आहे, मोठ्या मेहनतीचा आहे. या त्यांच्या कष्टाच्या घामाचा वास त्या चाफ्याचा सुगंध आणखीनच दरवळवतो.

वेलणकर कुटुंब मूळचे विजयदुर्ग या बंदरावरचे रहिवासी. त्यांच्या वडिलांचा म्हणजे गोपीनाथरावांचा त्या काळी टुरिंग टॅक्सीचा व्यवसाय आणि त्यानंतर खास आवड म्हणून फळ आणि फुलझाडांच्या नर्सरीचा. वेलणकर नर्सरीमध्ये इतर कलमे होतीच; पण त्यात सोनचाफा ही त्यांची स्पेशालिटी. देवगडच्या गोगटे परिवाराने जशी स्वखर्चाने लोकांच्या शेतात आंब्याची कलमे लावली, तशी वेलणकर परिवाराने सोनचाफ्याची झाडे लावली. कालांतराने हे कुटुंब व्यवसायानिमित्त कोल्हापूरला स्थलांतरित झाले, तिथे त्यांनी अनेक उद्योग उभारले, ते यशस्वीही केले. आणि पुन्हा आपल्या निसर्गरम्य कोकणच्या ओढीने सत्तर साली वेताळ बांबर्डे या गावी जमीन खरेदी करून स्थायिक झाले. त्या काळात त्यांनी आंबा, नारळ, फोफळी, काजू अशी मोठी बागायती उभी केली. ८० साली वडील निवर्तले आणि शेतीभाती, बागायतीची धुरा उदयरावांकडे आली. आपला मूळ व्यवसाय म्हणून उदयरावांनी छोट्या प्रमाणात झाडांची नर्सरी सुरू केली आणि टेम्पोतून गावोगावच्या आठवडी बाजारात जाऊन विविध प्रकारच्या कलमांची विक्री सुरू केली. 



दरम्यान एके दिवशी वेलणकर आरटीओ कार्यालयातील कामानिमित्त रत्नागिरीला गेले होते. हातात थोडासा मोकळा वेळ होता, काही नवीन प्रकार पाहता येतील म्हणून ते तिथल्या एका नर्सरीत गेले आणि त्यांनी तिथे ‘सोनचाफा कलमे आहेत का, ’ अशी विचारणा केली. तिथले खेर नावाचे गृहस्थ म्हणाले, ‘सध्या दर्जेदार सोनचाफा कलमे मिळतच नाहीत. पूर्वी आम्हांला वेलणकर नावाचे गृहस्थ सोनचाफा पुरवायचे. त्यानंतर आम्ही कलमे ठेवणे बंद केले.’ उदयराव अभिमानाने म्हणाले, ‘मी त्यांचाच मुलगा.’ मग काय, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्यांनी मोठ्या आग्रहाने पुढच्या सीझनसाठी सोनचाफा कलमांची वेलणकरांना ऑर्डर दिली. इथून पुन्हा सोनचाफ्याचा प्रवास सुरू झाला... 

वेलणकर सांगतात, ‘सोनचाफ्यामध्ये सात जाती आहेत, पण त्यातल्या गडद केशरी (भगवा), फिक्कट पिवळा, शुभ्र पांढरा आणि गडद पिवळा या चार जाती प्रचलित आहेत. त्यातली गडद पिवळा ही जात बारमाही फुले देणारी असून ती व्यावसायिक लागवडीस योग्य अशी आहे. या जातीचे शुद्ध वाण त्यांनी मिळवले, त्याची त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने वाढ केली, घरच्या मातृवृक्षावर त्याची कलमे बांधली आणि पुढे ही जात ‘वेलणकर चाफा’ या नावाने प्रचलित केली. त्यानंतर मात्र नर्सरीतले इतर सर्व प्रकार बंद करून फक्त वेलणकर सोनचाफ्यावर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला ही कलमे स्थानिक आणि बाहेरच्या नर्सरीना विक्रीसाठी ते पुरवत असत; पण त्यातले अनुभव फारसे चांगले नव्हते. नर्सरीतली दुसरीकडून आणलेली सोनचाफा कलमेसुद्धा वेलणकरांच्या नावाने विक्री होत असत आणि मग... 
चाफा बोलेना.. 
चाफा चालेना.. 
चाफा खंत करी.. 
काही केल्या फुलेना... 
अशा प्रकारच्या लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. 

आपल्या उत्पादनाची शंभर टक्के खात्री असल्याने मग वेलणकरांनी व्यवसायाचा एक नवीन फंडा आखला. आपली कलमे थेट शेतकऱ्यांना पुरवायची असे त्यांनी ठरवले. अर्थात ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नव्हती. कारण जिल्ह्यात तितकं मार्केट नव्हतं, ते आजही नाही. त्यांनी मग फुलमार्केटचा अभ्यास सुरू केला. ज्या शहरात विकसित फूलबाजार आहे त्याच्या लगतच्या गावातील सोनचाफा लागवड करणारे शेतकरी त्यांनी केंद्रित केले. त्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे या शहराच्या जवळपासच्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांनी ही कलमे पुरविणे सुरू केले. तेव्हाचा ठाणे जिल्हा म्हणजे आताचा पालघर आणि ठाणे भाग. यातील ग्रामीण भागात मुंबई/ठाणे फुलमार्केटमुळे सुमारे आठ ते दहा हजार एकर क्षेत्रातील फुलशेतीत सोनचाफा लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच पुण्याच्या आसपास चार-पाचशे एकर फुलशेती लागवड आहे. त्यातील बहुतांश भागात वेलणकर चाफा लावला जातो. यासाठीची त्यांची तपश्चर्या मोठी आहे. यासोबत आज कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यातील अनेक शेतकरी वेलणकर चाफ्याचे ग्राहक आहेत. 



मघा मी म्हणालो, ते ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजे स्वतः उत्पादन सुरू करा, त्याचा दर्जा ठेवा आणि त्याचा प्रसार करा हे तंत्र वेलणकर यांनी त्या वेळेपासून आत्मसात केलेले आहे. म्हणूनच दर वर्षी त्यांच्या बागेतल्या दोन हजार मातृवृक्षांपासून तयार होणारी दहा हजार कलमे शेतकरी स्वतः येऊन घेऊन जातात. या व्यवसायात वर्षाला दहा ते बारा लाखांची त्यांची उलाढाल आहे. इतका सगळा व्याप त्यांचं अख्खं कुटुंब आणि कायमस्वरूपी कामाला असणारे दोन कामगार यांच्याकडूनच सांभाळला जातो. प्रचंड मेहनती असा हा परिवार आहे, आणि विशेष म्हणजे अगदी आत्मनिर्भर आहे. यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट त्यांची स्वतःची आहे. दोन हजार मातृवृक्ष, कलमांना आधारासाठी लागणारे बांबू उत्पादन, सेंद्रिय खतासाठी गाई-गुरे अश्या सर्व गोष्टी त्यात आल्या. उदयराव यांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं आहे, कोणत्याही विषयाचं तांत्रिक ज्ञान त्यांनी पुस्तकातून घेतलेलं नाही, तर ते अनुभवाने मिळवलेलं आहे. पाण्यासाठीचं डिझेल इंजिन असो वा घरच्या दोन-चार चाकी गाड्या असोत, त्यांच्या दुरुस्तीसाठी त्यांना कधी मेकॅनिकची गरज भासत नाही. बागेतलं प्लंबिंग असो, शेडचं सुतारकाम असो वा वेल्डिंगचं काम असो, सगळं काही उदयराव स्वतः करतात. त्यांच्या या आत्मनिर्भरतेचे संस्कार त्यांच्या तिन्ही मुलांवर झालेले दिसतात. इथे त्यांच्यासोबत असणारा मुलगा तर हे सर्व करतोच; पण मर्चंट नेव्हीत असणारे दोन्ही चिरंजीव सुट्टीच्या कालावधीत ही सगळी कामं आवर्जून करतात. 

उदयराव साठीचे आहेत पण त्यांचा फिटनेस आणि उत्साह अगदी तिशीतला आहे. प्रत्येक विषयावर अगदी भरभरून आणि अभ्यासपूर्ण बोलतात. 

त्यांना मी विचारलं, की सोनचाफ्याच्या व्यावसायिक लागवडीस जिल्ह्यात कितपत संधी आहे? यावर त्यांचं म्हणणं असं, ‘मातृवृक्षांच्या बागेतून कलमांची योग्य निवड, पाण्याचा निचरा होणारी जमीन, मोकळा सूर्यप्रकाश आणि उन्हाळ्यातल्या पाण्याचं नियोजन यावर लक्ष दिलं तर इथल्या जमिनीत चाफ्याचं चांगलं उत्पन्न येऊ शकतं; पण फुलांच्या विक्रीसाठी इथे विकसित मार्केट नाही आणि देवपूजा किवा इतर वापरासाठी सर्रास फुलं विकत घेण्याचा स्थानिक पातळीवर ट्रेंड नाही. त्यामुळे विक्रीचा प्रश्न उभा राहतो. कोणत्याही सुगंधी फुलाचं आयुष्य एका दिवसाचं असतं. चाफ्याची फुलं पहाटेच्या वेळी काढून, त्याचं पॅकिंग करून सूर्याची प्रखर किरणं यायच्याअगोदर ते फूल मार्केटला पोचायला हवं. ही वेळेची मर्यादा इथे आहे, त्यामुळे तूर्तास इथे हे शक्य दिसत नाही. पुढे-मागे चिपीचा विमानतळ होऊन विमानसेवा सुरू झालीच तर मात्र मोठा स्कोप असेल.’ 

‘तुमच्याप्रमाणे कलमांना बाहेरचं मार्केट विचारात घेतलं तर या प्रकारच्या नर्सरी व्यवसायात संधी असू शकतात, तरीही जिल्ह्यातील फारसे व्यावसायिक यात का दिसत नाहीत?’

या प्रश्नावर ते म्हणाले, ‘यात खूप मोठा संयम लागतो. बी रुजत घातल्यापासून, त्याचं रोप होणं, मातृवृक्षावर ते कलम बांधणं, त्यावरून उतरणं, त्याची योग्य वाढ करणं आणि मग विक्री करणं या प्रवासाला किमान दोन वर्षं लागतात. इतका धीर आहे कुणाकडे? लोक सहा महिन्यांत तयार होणाऱ्या कलमांना अधिकचं प्राधान्य देतात.’ 

गेली अनेक वर्षे वेलणकर यांचे ग्राहक असलेल्या वसईच्या रॉबर्ट दिब्रेटो या प्रगतिशील शेतकऱ्याबाबत आदराने बोलताना ते म्हणाले, ‘सोनचाफ्याची एकरी साधारण चारशे कलमे अशी लागवड होते आणि त्याचे वार्षिक उत्पन्न हे चार ते साडेचार लाख मिळते. परंतु दिब्रेटो यांनी केवळ २८० कलमांपासून वार्षिक नऊ लाख उत्पन्न घेण्याचा विक्रम केला आहे, शेतीच्या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. प्रत्येक गौरव समारंभात आपल्या यशात वेलणकर चाफ्याचा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात तेव्हा आजवरच्या कष्टाचे चीज होते आणि खूप समाधान मिळते.’ 

सोनचाफा विषयात अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘सोनचाफा कलमापासून दुसऱ्या वर्षी उत्पन्न मिळायला सुरुवात होते. ते बारमाही असते आणि याचे सरासरी आयुष्य ३५-४० वर्षे असते. बियांपासून जी रोपे येतात त्यांचे उत्पन्न बाराव्या वर्षांनंतर सुरू होते. त्यांचे आयुष्यमान मोठे असते. परंतु त्या झाडांना वर्षातून फक्त श्रावणातच फुले येतात.’ 

पन्हाळगडावर असे आंब्या फणसासारखा मोठा व्यास असलेले सोनचाफा वृक्ष आढळून येतात. त्या काळात गडावरच्या सोमेश्वराला एक लाख सोनचाफा फुलांचा अभिषेक करायचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरविले होते आणि त्या फुलांसाठी अगोदरच गडावर एक हजार सोनचाफा वृक्षांची लागवड केली होती.  

वेलणकर परिवाराचा दहा एकरचा हा परिसर हिरव्या गर्द वनराईने नटलेला आहे. आंबा, काजू, नारळ, फोफळी यांचंही उत्पन्न मोठं आहे. त्यांचा नारळ तर खास बियाणं म्हणून केरळला जातो. तिथे रोप रुजवून मग त्याची विक्री होते. मातृवृक्षापासून बारमाही मिळणारी रोजची १५०० ते २००० फुलं सावंतवाडी, कणकवली, कुडाळ या शहरात विक्रीसाठी जातात. या सगळ्याचं व्यवस्थापन पुन्हा घरचीच मंडळी करतात. 

खरं तर मी डॉ. प्रसाद देवधर यांच्या खास आग्रहाने ‘वेलणकर सोनचाफा’ नर्सरी पाहायला गेलो होतो. तिथे गेल्यावर वेलणकर सोनचाफा फार्मची महती तर जाणून घेतलीच; पण उदय गोपीनाथ वेलणकर यांच्यासारखं एक आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व अनुभवता आलं, जे खूप काही शिकवून गेलं... 

वेलणकर परिवाराच्या कीर्तीचा हा सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो.. शुभेच्छा... 

संपर्क : श्री. वेलणकर ९६७३७ ४०८६२, ९४२२३ ७३७२०
.....
- प्रभाकर सावंत
संपर्क : ९४२२३ ७३८५५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HYLCCO
Similar Posts
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
कोकणातली आत्मनिर्भरता सुस्पष्ट दाखवणारी ‘झूम लेन्स’ शहराच्या दिशेने गेलेले अनेक तरुण आज पुन्हा कोकणात परतले आहेत. परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं एक मन सांगतंय, की इथेच काही तरी केलं पाहिजे आणि दुसरं मन विचारतंय काही करणं मला जमेल का? अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना प्रेरणा देणारी गोष्ट आज मी इथे सांगणार आहे. गोष्ट आहे आपल्याच सिंधुदुर्ग
पारंपरिक भात वाणांचे जतन आणि संवर्धन : सिंधुदुर्गातील प्रयोग शेतीतल्या पारंपरिक बियाण्यांची देशभरातल्या सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता ‘राहीबाई पोपेरे’ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने. पारंपरिक बियाण्यांचे ३५०हून अधिक वाण या बीजमातेने अनोख्या रीतीने जतन केलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे काही प्रयोग सुरू असल्याचे समजले म्हणून हा लेखप्रपंच
मुडी...! बियाण्यासाठीचं धान्य साठवण्याच्या घरगुती मुड्या आज कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही; मात्र बालपणी पाहिलेल्या वस्तू कालौघातही पटकन विसरता येत नाहीत. ‘मुडी’विषयी बाबू घाडीगावकर यांनी केलेलं हे स्मरणरंजन...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language